कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील फुलेवाडी उपनगरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गँगवॉरमध्ये हद्दपार झालेला सराईत गुन्हेगार महेश शिवाजी राख (वय 23, रा. अहिल्याबाई होळकर नगर) याची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत महेशचा मित्र विश्वजीत फाले गंभीर जखमी झाला आहे. अचानक झालेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापूर शहरात परतला होता. तो परत आल्यावर काही तासांतच गंगाई लॉनजवळ हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी गजासह हल्ला केला. चार ते पाच जणांच्या टोळक्याने महेशवर तुटून पडत त्याला जागेवरच ठार केले. त्याचा मित्र विश्वजीत फाले या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून उपचार सुरू आहेत. यावेळी आरोपींनी महेशचा मित्र ओंकारच्या घरावर बिअर बाटल्या आणि दगडफेक करून तेथेही नुकसान केले. या प्रकरणी करवीर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पत्नीमुळे सुरु झालेल्या वादातून जीवघेणा संघर्ष
करवीर पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या खुनामागचे कारण व्यक्तिगत सूड असल्याचे दिसून येत आहे. संशयित आदित्य गवळी आणि महेश राख यांच्यात गवळीची पत्नी कस्तुरीवरून वाद सुरू होता. महेशने तिला घरी आणून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद आणि भांडणे घडत होती. या वैमनस्यातूनच मध्यरात्री आदित्य गवळी व साथीदारांनी हल्ला घडवून आणला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये आदित्य गवळी, हर्षद गवळी, हर्षवर्धन शर्मा, शुभम साळोके उर्फ समर, पियुष कांबळे, पियुष पाटील आणि यशम कुटे यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे. तसेच किंचित अंतरावरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा शोध गतीमान करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात माहिती घेऊन तपासाचा वेग वाढवला आहे.





